मंगळवार, ३१ मे, २०११

अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन

अखिल  भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन,
विष्णुदास भावे नाट्यगृह,सांगली .   
दि. १७ ते १९ जून २०११
मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १७ जूनपासून सांगलीत
सांगली, २५ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नववे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन दि. १७ ते १९ जून या कालावधीत सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने , विलास सोनवणे व गझलकार ए. के. शेख यांनी दिली.
या साहित्य संमेलनाचे स्थळ, स्वागत व संयोजन समिती निवडीसाठी दि. ७ मार्च रोजी मुस्लीम अर्बन को-ऑप सोसायटी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनात मुस्लीम साहित्यिकांबरोबरच सर्व पुरोगामी संघटना, विचारवंत, व्यापारी व उपेक्षित वर्ग आदींचा सहभाग राहणार आहे. राज्यातील विविध शहरांत प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजित करून त्या त्या भागातील मुस्लीम समाजातील व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लीम समाजाचा इतिहास, सांस्कृतिक देवाण-घेवाण, इतिहासातील योगदान, समस्या व उपेक्षित वर्गाचा विचार या साहित्य संमेलनात प्रामुख्याने मांडला जाणार आहे.
यंदाच्या साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडीत मुस्लीम समाजाचा इतिहास मांडला जाणार आहे. तसेच मुस्लीम समाज संस्कृतीचे मराठी भाषेशी असलेले नातेसंबंध चित्ररथ व देखावा आदींच्या माध्यमातून साकारले जाणार आहे. सांगली जिल्हय़ातील सर्व सामाजिक व सांस्कृतिक मंडळे व संघटना आदींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या साहित्य संमेलनाच्या स्वागत व संयोजन समितीत घेण्यात येणार असून साहित्यिक, वकील, डॉक्टर, व्यापारी व साहित्यविषयक काम करणाऱ्या संस्थांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी युनूस मुलाणी, अ‍ॅड. रियाज जमादार, ए. आय. मुजावर, डॉ. डी. एच. मुल्ला, आसिफ बावा, महंमद वडगावकर, जब्बार तहसीलदार, हनिफ डफेदार, निसार कलाल, रफिक कडलास्कर, प्रशांत पाटील, आयुब मुल्ला व फारूख संगतराज आदी विशेष प्रयत्नशील असल्याचेही डॉ. शेख इक्बाल मिन्ने, विलास सोनवणे व ए. के. शेख यांनी सांगितले.



या संमेलनात विविध विषयावर चर्चासत्रे , परिसंवाद तसेच काव्य संमेलन, मिलाजुला मुशायरा, मराठी गजलांचा कार्यक्रम अशाविविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिक,  रसिक, सर्वसामान्य नागरिक या सर्वांना या कार्यक्रमाचा आस्वाद तर घेता येईलच पण त्याच बरोबर त्यांच्याशी वैचारिक देवाण-घेवाण   करता येईल  अशी आम्हाला आशा वाटते.
सांगलीत होणाऱ्या या संमेलनाकरीता सर्वांना हार्दिक निमंत्रण आणि सर्वांचे सांगलीत आणि संमेलनात सहर्ष स्वागत....!आपले  विनीत,

मुफिद मुजावर- ९४०४७११९४०
दाहर मुजावर- ९८६०४०६७२४
सलीम पिंजारी- ९२७०२४४१८४
मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक  मंडळ, पुणे जिल्हा शाखा,