मंगळवार, २८ जून, २०११

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हा सुसंवादाचा प्रभावी मंच - कॉ. विलास सोनवणे

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे मुस्लिम समाज आणि समाजातील इतर घटक यांच्यातील सुसंवादासाठी एकमेवाद्वीतीय आणि अत्यंत प्रभावी मंच आहे, असे विचार मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे नेते कॉ. विलास सोनवणे यांनी मांडले. मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या पुणे जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित "मुस्लिम   मराठी साहित्य : एक ओळख"    या  परिसंवादात ते बोलत होते.
मुस्लिम मराठी साहित्य हे मुस्लिम समाजजीवनाची अभिव्यक्ती मांडण्याचे माध्यम असून जो कोणी ही अभिव्यक्ती आपल्या साहित्यातून मांडतो तो कोणत्या ही धर्माचा असलातरी तो मुस्लिम मराठी साहित्यिक आहे असे मत त्यांनी मांडले. अनंत अडचणी आणि स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या ढोंगी धर्मनिरपेक्ष हितशत्रूंच्या कारवायांवर मात करून यंदा १७ ते १९ जूनला सांगलीत अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठी मुस्लिमांच्या सामाजिक वेदना साहित्यातून मांडण्यासाठी अधिकाधिक लेखन होणे आवश्यक आहे, असे विचार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी व्यक्त केले. मुस्लिमांना मराठी येत नाही असा गैरसमज निर्माण करण्यात आला होता त्याला मुस्लिम मराठी साहित्याने तडा दिला, असे मत गूढकथाकार बशीर मुजावर यांनी व्यक्त केले. यावेळी सलीम पिंजारी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी झालेल्या काव्य संमेलनात प्रा. इब्राहीम फैज, बद्दीउज्जमा बिराजदार, आय. के. शेख, राजेंद्र सोनावणे, श्रीधर पाटील यांनी सहभाग घेतला. काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन मलिक नदाफ यांनी केले.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाहर मुजावर यांनी केले. स्वागत शरीफा बाले यांनी केले तर वर्षा पांढरे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात साहित्यिक, रसिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा