सोमवार, १ डिसेंबर, २०१४

"मुस्लिम मराठी साहित्य :एक सांस्कृतिक राजकारण"

रविवार दि. ९ नोव्हेंबरच्या महाराष्ट्र टाइम्सच्या 'संवादपुरवणीत 'मुस्लिम मराठी साहित्य : प्रेरणा आणि स्वरूप' संपादक / प्रा. फ. म. शहाजिंदे प्रा. फारुख तांबोळी या नव्या ग्रंथावर 'मध्यमवर्गीय आवर्तात मुस्लिम मराठी साहित्यया मथळ्यात श्री. जी. के. ऐनापुरे यांचा समीक्षा लेख आला होता. लेख पाहण्यासठी त्याचा दुवा खाली दिला आहे.
या समीक्षेतील काही बाबी मला खटकल्या मुळे त्याला प्रतिक्रिया देणारा लेख मी लिहिला असून तो म.टा. कडे पाठवला आहे. उपरोक्त समीक्षा लेख आणि त्याला माझी प्रतिक्रिया आपल्या विचारार्थ येथे देत आहे. प्रतिक्रिया, सूचनांचे हार्दिक स्वागत आहे.
"मुस्लिम मराठी साहित्य :एक सांस्कृतिक राजकारण"
- मुफिद मुजावर मो.०९७११७४२३४८
प्रा. फ. म. शहाजिंदे आणि प्रा. फारुख तांबोळी संपादित 'मुस्लिम मराठी साहित्य: प्रेरणा आणि स्वरूप' या ग्रंथावरील श्री.जी. के. ऐनापुरे यांचा रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०१४ च्या महाराष्ट्र टाइम्समधील समीक्षा लेख वाचला. श्री. ऐनापुरे यांनी आपल्या समीक्षेत मुस्लिम मराठी साहित्यातील (चळवळीतील) साहित्यकांमधील आपल्या कामाच्या जोरावर आपल्या समूहाच्या बाहेर जाणे आणि धर्मनिरपेक्षतेच्या अंगाने सांस्कृतिक पसाऱ्यात टिकून राहण्याच्यासंदर्भातील अनभिज्ञेतेवर ताशेरे ओढले आहेत. तसेच मुस्लिम मराठी साहित्यहे मध्यमवर्गीय आवर्तातअडकलेले असून मुस्लिम मराठी साहित्यअशा वेगळ्या नामांतरणानेएकत्र येण्याची धडपड करणाऱ्या लोकांच्या प्रेरणांचे स्वरूपहे स्मरणरंजनअसल्याची टीका केली आहे. ग्रंथाच्या मांडणीच्या तांत्रिक बाबींचा विचार करता या ग्रंथाची घडण ही काहीशी सैलसर आहे. बहुदा ग्रंथाच्या संपादकांनी आपले संपादकीय अधिकारांचा कमीत कमी वापर करण्याचे ठरवले असल्यामुळे असे झाले असावे. त्यामुळेच बहुदा या ग्रंथातील प्रेरणासमीक्षकाला स्मरणरंजनभासल्या असाव्यात. मात्र टीकेचा रोख या ग्रंथापुरता सीमित न राहता एकूण मुस्लिम मराठी साहित्य चळवळीला अप्रासंगिक सिद्ध करण्याकडे असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे यावर चर्चा होणे अतिशय आवश्यक वाटल्यामुळे हा लेखप्रपंच.
आधुनिकतेच्या अनुषंगाने साहित्य आणि साहित्यिकविषयक चर्चाविश्व हे निर्विवादपणे उच्चजातीय-मध्यमवर्गीय क्रियाकलापाचा भाग असतो. संतसाहित्य आणि लोकसाहित्य हे बहुतांशवेळा या चर्चाविश्वात साहित्य अभ्यासाच्यारूपातच डोकावत असतात. तरी देखील या प्रस्थापित उच्चजातीय-मध्यमवर्गीय समुदायाच्या परिघाबाहेर ढकलले गेल्याची जाणीव होऊन आत्मभान आलेले विविध वंचित समुदाय पर्यायी वैचारिक भूमिका घेऊन साहित्य निर्मिती करत संघटीत झाले. त्यामुळे दलित-ग्रामीण-जनवादी ही तसेच आदिवासी- मुस्लिम मराठी- ख्रिस्ती मराठी -जैन मराठी इत्यादी साहित्यांची फक्त नामांतरे नसून त्या त्या समूहांच्या अस्मितांचे हुंकार आहेत. या साहित्यांच्या निर्मितीची क्षणिक प्रेरणा जर फक्त वर्तमानकालीन सामाजिक पर्यावरणात असत्या तर त्या आधारावर ही साहित्याची नामांतरणेजास्त काळ वाटचाल करू शकल्या नसत्या. उदाहरण घ्यायचे झाल्यास मराठी ख्रिस्ती साहित्याच्या परंपरेची वाटचाल सतराव्या शतकातील फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्तपुराणापासून सुरवात करत एकोणिसाव्या शतकात बाबा पदमजींच्या यमुना पर्यटनआणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रेते उत्तार्धात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ओअॅसिसच्या शोधातच्या पुढे आता एकविसाव्या शतकात सुरु आहे. यावरून वर्तमान मराठी ख्रिस्ती साहित्याच्या भूतकाळातील प्रेरणा देखील अधोरेखित होतात. मुस्लिम मराठी साहित्याने देखील अशाच प्रकारे दीर्घ प्रवास केला आहे. त्यामुळे श्री. ऐनापुरे यांना मध्यमवर्गीय आदिबंधतोडू न शकणाऱ्या फिक्यामुस्लिम मराठी साहित्याची आत्ताशी सुरवात झाल्याचे जरी वाटत असले तरी ते वास्तव नाही. मुस्लिम मराठी संतकवी इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून मराठीत रचना करत असल्याचे प्रमाण उपलब्ध आहेत. या मुस्लिम मराठी संतकवींच्या रचनांची नाळ इथल्या मातीतल्या सुफी-भक्ती परंपरेशी जोडलेली होती. त्यांनी तुर्की-फारसी-अरबी ऐवजी आपल्या मायबोली मराठीतून रचना केल्या. मृत्युंजय’ ‘ज्ञानसागरानंद’ ‘कादरी बेदरी बाच्छाअसलेल्या शाह मुंतोजी ब्रम्हणी यांनी उपनिषदांचे सार | वेदशास्त्रांचे गव्हर | सिद्धान्तीचे बीजाक्षर |’ असलेल्या प्रकाशदीपची रचना केली. मीपणाचा त्याग करून परमेश्वराशी एकरूप होण्याचा योगसंग्रामज्याच्या हृदयीं गोविंदआहे अश्या अविंधशेख महंमद यांनी रचला. याशिवाय हुसेन अंबरखान, अलमखान, शेख सुलतान,शाह मुनी यांच्या सारख्या अनेक मुस्लिम मराठी संत कवींची आणि त्यांच्या साहित्याची भलीमोठी यादीच या ठिकाणी देता येईल पण विस्तारभयास्तव ती टाळणे भाग आहे. या सर्व संतकवींच्या साहित्यात जागोजागी दिसणारी सुफी-भक्ती परंपरेतील परमेश्वराशी एकरूप होण्याची ओढ, जातधर्मभेद निरपेक्ष वैश्विक मानवी मूल्ये हीच या संत कवींच्या साहित्याची प्रेरणास्त्रोत होत. 
काळपरत्वे बदलत जाणाऱ्या परिस्थिती नुसार साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा बदलत जातात. आधुनिकतेच्या जाणीवांच्या सोबत छपाई तंत्रज्ञानाचा प्रसार आणि राष्ट्रवादाच्या उदयाने भारतातल्या उच्चजातीय-मध्यमवर्गाच्या साहित्य प्रेरणांना आकार दिला. त्यांनी या छपाई तंत्राचा ज्ञानविश्वावरील मक्तेदारी राखण्यासाठी उपयोग केला. तशीच मक्तेदारी त्यांनी साहित्य क्षेत्रावर प्रस्तापित करून आपल्या जात-वर्ग जाणिवांनाच मुख्य प्रवाहातील जाणीव म्हणून प्रस्तुत केले. याच काळात प्रस्तापितांच्या या साहित्य व्यवहाराला आव्हान देणारा प्रवाह महात्मा फुले आणि सत्यशोधक साहित्याच्या रूपाने पुढे आला. या प्रवाहाने जातिव्यवस्थेतील शोषणावर कोरडे ओढले आणि परीघावर ठेवलेल्या समूहांच्यावतीने आवाज बुलंद केला. महात्मा फुलेंनी तत्कालीन प्रस्थापित जातवर्गाच्या मुसलमानांच्या प्रती असलेल्या द्वेष भावनेची मीमांसा केली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देखील जेंव्हा कादंबऱ्या आणि नाटकांमध्ये मुसलमान पात्रे ही नेहमी खलनायकाच्या भूमिकेत असायची आणि आज ही बहुतांश वेळा ती तशीच असतात, तरी देखील फुल्यांच्या तृतीय रत्न मध्ये मुसलमान पात्र तटस्थ भूमिकेतून डोकावते. इस्लाम आणि महंमद पैगंबरांच्या संदर्भातील युरोपकेंद्रित पौर्वात्यवादी आकलनाच्या प्रभावात इथले विचारवंत असताना देखील फुल्यांनी महंमद झाला जहामर्द खरा || त्यागीले संसारा || सत्यासाठी ||’ अशी सुरवात असणारा मानव महंमदसारखा अखंड रचला. 
राष्ट्रवादाच्या चर्चाविश्वात मुसलमानांना परीघावर ढकलले जात असताना, इतिहासात आणि ऐतिहासिक साहित्यात मुसलमानांचे जुलमी, रानटी, गोहत्या करणारे, बायका पळवणारे, हिंदूंचा धर्मच्छळ करणारे, मंदिरे पाडणारे अशा प्रकारचे प्रस्तुतीकरण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रचंड वाढले. याला राष्ट्रीय सभेच्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला विरोध करणारे मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेचे परस्पर विरोधी मात्र गुणात्मक दृष्ट्या एकसारखे असणारे राष्ट्रवाद कारणीभूत होते. या काळात मुस्लिम मराठी साहित्यिक-विचारवंत-स्वातंत्र्यसैनिकांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची कास धरत साहित्य निर्मिती केली. यातले बरेच साहित्यक-विचारवंत-इतिहासकार मराठी वैचारिक चर्चाविश्वाच्या स्मृतीपटलावरून नाहीसे झाले. यांपैकी मियां सिकंदरलाल अत्तार यांनी १९२३-२४ मध्ये इस्लाम-दर्शननावाचे त्रैमासिक चालवले. यात त्यांनी विविध प्रकारचे ऐतिहासिक लेख प्रकाशित केले. इतिहासलेखनातील मुसलमानांच्या विकृत प्रतिमा खोडून काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे दिसून येते. जवळपास पंचवीस वर्षे या व्यक्तीने तत्कालीन सातारा जिल्ह्याच्या परिसरात पायपीट करून ऐतिहासिक कागदपत्रे, मराठीतील मोहरमचे जंगनामे आणि जुन्या वस्तू संग्रहित केल्या. सध्याच्या सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावातून पुण्यापर्यंत प्रवास करून त्यांनी वेळोवेळी भारत इतिहास संशोधक मंडळात आपल्या शोधनिबंधांचे वाचन केले. अत्तारांच्या प्रमाणेच सांगली शहराचे असलेल्या सय्यद अमीन यांनी इतिहास, तत्वज्ञान आणि थोर व्यक्तींची चरित्रे यांवर भरपूर लिखाण करून ती ग्रंथमालेच्या रुपात प्रसिद्ध केली. मुसलमानांना शिवाजी महाराजांचे शत्रू म्हणून हिणवले जात असताना त्यांनी महापुरुष छत्रपति शिवाजीसारखा सर्वधर्मसमभावी आणि सहिष्णू महाराजांचे चित्रण करणारे चरित्र लिहिले. मुसलमानांना तुच्छतेने पॅन-इस्लामवालेआणि लीगीम्हटले जात असल्याच्या काळात तुर्कस्तानातील आधुनिक-धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे प्रणेते असलेल्या अतातुर्क कमाल पाशायांचे चरित्र अमीन यांनी लिहून प्रकाशित केले. इस्लामची स्थापना आणि महंमद पैगंबर यांच्या मागील मानवी मुल्यांविषयी मराठी जनमानसाला माहिती देणारा हजरत महंमद पैगंबरहे चरित्र देखील त्यांच्या लेखणीतून साकारले. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंग कुमठेकर यांनी अतिशय परिश्रमाने आणि चिकाटीने अत्तारांचे साहित्य संग्रहित करून त्यांचे कार्य प्रकाशात आणले. सय्यद अमीन यांचे सुपुत्र सिकंदर अमीन यांनी निस्पृहपणे आपल्या पित्याचे कार्य जिवंत ठेवण्यासाठी सय्यद अमीन यांचे ग्रंथ पुर्नमुद्रित केले. कुमठेकर आणि सिकंदर अमीन यांच्या या योगदानामुळे अत्तार आणि अमीन यांचे कार्य आणि साहित्य विस्मरणाच्या गर्तेतून बाहेर आले पण अजून ही कित्येकांना या गर्तेतून बाहेर काढणे बाकी आहे. अत्तार आणि अमीन या दोघांच्या कार्यकाळात १०-२० वर्षाचे अंतर असून देखील या दोघांनी आपल्या प्रकाशित होणाऱ्या साहित्याला इस्लामी साहित्यकिंवा मुस्लिम साहित्यअसे नाव न देता मराठी मुस्लिम साहित्य’ ‘मुस्लिम मराठी साहित्यआणि महाराष्ट्र मुस्लिम साहित्यअशी नावे दिली. तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांना जे प्रश्न भेडसावत होते, त्यांच्या ज्या जाणीवा जागरूक झाल्या होत्या उदाहरणार्थ मराठी मुस्लिम भाषिक, सांस्कृतिक तसेच प्रादेशिक अस्मिता, जमातवादाचा प्रश्न, सर्वसमावेशी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, मानवी मुल्ये इत्यादींचा प्रभाव त्यांच्या लेखणीवर पडल्याचे दिसते. हेच प्रश्न आणि याच जाणीवा त्यांच्या साहित्याच्या प्रेरणा ठरल्या. 
स्वातंत्रोत्तरकाळात नेहरूवादी सर्वधर्मसमभावी राष्ट्रवादाचा प्रभाव साहित्यकांवर आणि अभ्यासकांवर राहिला आहे. प्रा. यु म पठाण यांनी आपल्या संतसाहित्याच्या आणि मराठी भाषेच्या अभ्यासातून समन्वयवादी भूतकाळाची मांडणी केली. श्री. ऐनापुरे यांनी उपहासाने त्यांचा एकमेवअसा उल्लेख केला आहे. वसाहतपूर्व काळातील फार्सी आणि मराठी मधील संबंध शत्रुभावी मानून मराठी भाषेवर फार्सी भाषेने आक्रमणकेल्याची मांडणी केली जात होती. याकाळात अत्यंत परिश्रमाने मराठी आणि फार्सी या दोन्ही भाषांचा अभ्यास करून फार्सी आणि मराठी या भाषांमधील अनुबंधसमोर आणण्याचे काम प्रा. यु. म. पठाण यांनी केले त्या अर्थाने ते एकमेवच ठरतात. 
श्री. ऐनापुरे यांनी एकोणीस साहित्यिक, अभ्यासक आणि कार्यकर्त्यांचे बावीस लेख असलेल्या या ग्रंथातील चार-पाच लेखांची दखल घेतलेली दिसते. ही दखल देखील बहुतांशी टीकात्मकच आहे. एकदा या लेखना स्मरणरंजनघोषित केले की त्यांची दखल नाही घेतली तरी चालते अशी श्री. ऐनापुरे यांची धारणा असावी. जर स्मरणरंजनहे आत्मकथनाच्या मार्गाने जात असेल आणि त्याद्वारे जीवनात आलेल्या अनुभुतींआणि त्याविरोधाचा आक्रोश आणि अस्मितांचे हुंकार ह्याच जर त्याच्या साहित्याच्या प्रेरणा असतील तर आत्मकथनांना अदखलपात्र ठरवणे हे कितपत योग्य आहे? या ग्रंथातल्या प्रत्येक साहित्यिकाच्या या स्मरणरंजनामध्ये मुस्लिम आहे म्हणून मराठी साहित्यवर्तुळातून नाकारले जाण्याची वेदना दिसून येत नाही का? ‘अहो तुम्ही मुस्लिम असून इतकी चांगली मराठीत कसे बोलता/लिहिता/कविता करता?’ अश्या प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची व्यथा दिसत नाही का? हे नाकारलेपण, ही परीघा बाहेर ढकलले जाण्याची जाणीव या साहित्याच्या प्रेरणा होऊ शकत नाहीत का? शिवणकामाचा व्यवसाय करणाऱ्या दिवंगत गजलकार मलिक नदाफ यांच्या कबीर समाज विणत गेला| मलिक समाज शिवत गेला||’ या ओळी मध्यमवर्गीय आवर्तातअडकल्या आहेत असे म्हणता येईल का? जावेद पाशांच्या कथेतील ममदू खाटीक’, ‘भंगारवाल्या कडे काम करणारी रशिदा’, ‘रहेमान रिक्षावाला’, ‘लालबेगी समाजातला अब्दुल्लाहे काय मध्यमवर्गीय आहेत
शासनाच्या धोरणांच्याद्वारे, राजकीय पक्षांच्या भूमिकेमधून, जमातवादी शक्तींच्या प्रचारामधून आणि मूलतत्त्ववादी विचारांच्या प्रसारामधून मराठीऐवजी उर्दूही मुसलमानांची मातृभाषाआहे असे ठसवले जात असतानाच्या परिस्थितीमध्ये देखील मराठी मुस्लिमांनी मराठीत साहित्यनिर्मिती करणे आणि मराठी भाषिक अस्मितेच्या आधारावर एकत्र येणेहा विद्रोहनाही का? अशाप्रकारचा विद्रोहकरणाऱ्या साहित्याचे स्वरूप हे कडव्या धार्मिकतेला, जमातवादी राजकारणाला, जागतिकपातळीवर भांडवलशाही साम्राज्यवाद जो संस्कृतींच्या(?) संघर्षाच्यानावाने भ्रम निर्माण करतो आहे त्याला विरोध करण्याचे नाही का? श्री. ऐनापुरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या 'थॉट्स ऑन पाकिस्तान' चा उल्लेख केला आहे. या ग्रंथातील आंबेडकरांच्या विचारांना मोडतोड करून भगव्या रुपात ढाळण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला गेला. या प्रयत्नांना डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी डॉ. आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार: विपर्यास आणि वस्तुस्थितीया सुगावा प्रकाशनाच्या पुस्तकाद्वारे जोरदार चपराक लगावली आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या या ग्रंथाला घेऊन मुसलमानांवर प्रश्नचिन्ह उभे करणे हे जमातवादी राजकारणाला बळी जाणे ठरेल. आंबेडकरी प्रेरणा मानून मुस्लिम मराठी साहित्याच्या स्वरुपाची व्याख्या करू पाहणाऱ्या मुस्लिम मराठी साहित्यातील अनेक प्रवाहातील एका प्रवाहाचा कॉ. विलास सोनवणे यांनी केलेल्या उल्लेखाकडे श्री. ऐनापुरे यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. बहुदा कॉ. सोनवणें यांनी आपल्या मार्क्सवादी आक्रमकतेनेहमीद दलवाई यांच्या वर केलेल्या टीकेवर श्री. ऐनापुरे यांनी भर दिल्यामुळे असे झाले असावे. हमीद दलवाई यांनी उपस्थित केलेला मुस्लिम प्रश्ननंतरच्या काळात उजव्या जमातवादी संघटनाच्या अजेंड्यावर आला याला इतिहास साक्षीदार आहे. मुस्लिम स्त्रियांचे स्थान आणि तलाकचा प्रश्नासाठी इस्लामवर आणि मुसलमानांवर टीका करण्याच्या नादात याप्रश्नांच्या मागील पुरुषसत्ताक विचारसरणीकडे केले गेलेले दुर्लक्ष्य मुसलमानांना भलतेच महागात पडले आहे. १९९२ नंतर बुरख्याचा वापर का वाढला याचा देखील जमातवाद-पुरुषसत्ता आणि स्त्रिया या संदर्भाने विचार करणे आवश्यक आहे. 
मुस्लिमांनी आपल्या देशभक्ती सिद्ध करावीया उजव्या विचारसारणीच्या अपेक्षे(?)प्रमाणे धर्माच्या जागतिक साठमारीत (मुस्लिम की ख्रिश्चन?)’ कोणाची बाजू घ्याची हे स्पष्ट करण्याची अपेक्षा(?) श्री. ऐनापुरे व्यक्त करतात. श्री. ऐनापुरे ज्याला जागतिक साठमारीम्हणतात तो जागतिक भांडवलशाही साम्राज्यवादाने संस्कृतींचा संघर्षया नावाखाली उभा केलेले भ्रामक वास्तव आहे, त्याचा उल्लेख प्रा.सलीम पिंजारी यांच्या लेखात आला आहे. कॉ. विलास सोनवणे यांनी या जागतिक भांडवलशाही साम्राज्यवादाच्या संस्कृतींचा संघर्षया भ्रामक वास्तवाला आणि मुस्लिम म्हणून एकसंघ-एकात्म-एकजिनसी (होमोजिनस) समूह असल्याच्या मिथकाला, मुस्लिमांच्या विषयी खोटी मिथके बनवण्याच्या जमातवादी सांस्कृतिक राजकारणाला मुस्लिम मराठी साहित्य हे फक्त समर्पक उत्तर नसून मराठी भाषा लिहिणाऱ्या-बोलणाऱ्या, मराठी अस्मिता जपणाऱ्या, मराठी मुस्लिमांचे या शक्तींच्या विरोधातले धारदार सांस्कृतिक राजकारण असल्याचे म्हटले आहे. कॉ. सोनवणे नेहमी म्हणतात त्याप्रमाणे, ‘महाराष्ट्राच्या कुठल्याश्या कोपऱ्यातील एखाद्या गावातील अथवा निमशहरी भागातील फारुख/सलीम/जावेद अशी नावे असलेला किंवा अशाच प्रकारची दुसरी नावे असलेला दुसरा कोणीही प्रमाणबद्ध(?) मराठी जरी त्याला येत नसली तरी आपल्या मोडक्या तोडक्या(?) मराठीत जेंव्हा आपल्या प्रेयसी प्रति आपल्या प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी कवितेच्या चार ओळी लिहितो तेंव्हा तो आपोआप भांडवली साम्राज्यवादी-जमातवादी सांस्कृतिक राजकारणाविरुद्ध त्याच्या मायबोली मराठीचा झेंडा हाती घेऊन उभा ठाकतो’. पण हे साहित्याचे सांस्कृतिक राजकारण साहित्य आणि साहित्य अभ्यासातील आनंदयात्रींना कोण समजावणार.

२ टिप्पण्या:

  1. ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ हा शोधप्रबंध लवकरच ईबुक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे.


    जयसिंगपूर (कवितासागर वृत्तसेवा) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अभ्यासक किशोरकुमार काशिनाथ कांबळे यांनी डिसेंबर २००९ मध्ये पीएच. डी. (मराठी) पदवीसाठी सादर केलेला व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून अधिकृतरीत्या मान्यताप्राप्त झालेला शोध प्रबंध ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ लवकरच ईबुक स्वरुपात कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर मार्फत प्रसिद्ध होत आहे. अशी माहिती प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनास देवचंद कॉलेज, अर्जुननगरचे यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर संशोधनातील सहा प्रकरणात खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे...

    • प्रकरण पहिले - प्राचीन मुस्लीम कवींची काव्य परंपरा: प्रास्ताविक, मुस्लिमांचे भारतात आगमन, भारतात इस्लाम धर्माचा स्वीकार, पार्श्वभूमी, मुस्लीम मराठी संतांचा उदय, मुस्लीम मराठी संत, मुस्लीम मराठी शाहीर, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण दुसरे - आधुनिक मुस्लीम कवींच्या मराठी कवितेचा उदय, विकास, स्वरूप व प्रेरणा: प्रास्ताविक, मुस्लीम साहित्याची पार्श्वभूमी, मुस्लीम साहित्य संकल्पना, मुस्लीम साहित्य व्याख्या, मुस्लीम साहित्याच्या प्रेरणा, मुस्लीम साहित्य प्रवाह, मुस्लीम कवितेचे स्वरूप आणि निष्कर्ष.

    • प्रकरण तिसरे - मुस्लीम मराठी कवितेचा आशय: प्रास्ताविक, सामाजिक आशय, धार्मिक - सांस्कृतिक आशय, राजकीय आशय, आर्थिक आशय, राष्ट्रीय एकात्मता, प्रबोधन, मानवतावाद आणि निष्कर्ष.

    • प्रकरण चौथे - मुस्लीम मराठी कवितेतील सांस्कृतिक संघर्ष: प्रास्ताविक, धर्मांतर, जातीयता, मूलतत्त्ववाद, उपरेपणाचं दु:ख, राष्ट्रनिष्ठा, मुस्लीम पुढा-यांचे राजकारण, मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण पाचवे - मुस्लीम मराठी कवितेचे वाङमयीन मूल्यमापन: प्रास्ताविक, कवितासंग्रहांची शीर्षके, कवितासंग्रहांची अर्पणपत्रिका, मुक्तछंदात्मक रचना, संवादात्मक, भाषा, प्रतिमा - प्रतीके, गझलेचा रचनाबंध, गझलेतील विषय.

    • प्रकरण सहावे - उपसंहार

    डॉ. किशोरकुमार कांबळे यांच्या ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनात उपरोक्त बाबींचा समावेश आहे. जवळपास ७५० - ८०० पृष्ठांचा हा समिक्षा / संदर्भग्रंथ कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून ईबुक स्वरूपात प्रसिध्द होत आहे. मुस्लिम मराठी कवींचे छायाचित्र / फोटो व त्यांच्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ सदर ग्रंथाच्या मुखपृष्ठावर प्रसिध्द करण्याचा विचार आहे. मराठी साहित्य आणि संस्कृती समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त असलेला सदर ग्रंथ इंटरनेटच्या माध्यमातून जगभर वाचला जाणार आहे. अधिकृतरीत्या आय. एस. बी. एन. नोंदणीकृत असलेला ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ हा समीक्षा ग्रंथ मराठी साहित्य विश्वातली एक अजोड कलाकृती ठरला आहे.

    संपर्कासाठी पत्ता: कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर, सुदर्शन बिल्डिंग, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, जयसिंगपूर - ४१६१०१, पोस्ट - जयसिंगपूर, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र. मुस्लिम कवींनी आपले छायाचित्र/पासपोर्ट आयडेंटीसाईज फोटो, आपला साहित्यिक परिचय व कवितासंग्रह / कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



    • पुस्तक - मुस्लीम कवींची मराठी कविता (समीक्षा ग्रंथ)
    • ISBN - 978-81-929803-4-8
    • लेखक - डॉ. किशोरकुमार कांबळे (7385218021)
    • प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
    • प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
    • संपर्क - 02322 - 225500, 9975873569
    • ईमेल - sunildadapatil@gmail.com


    उत्तर द्याहटवा