शाळंला हुतो तवाची गोस्ट... काळाकुट्ट ...जबरी डोळे आनी आवाजाचा शोएब बारगीर नावाचं आडदांड आन् मागच्या बाकाला शोभणारा इद्यार्थी होता. त्याला किरकेटचं लई येड पन हुतं. नावच शोएब असल्यामुळं शोएब अख्तर आवडायचा.. म्हनून त्याची टीम पन आवडायची. म्हनजे पाकिस्तानची किरकेट टीम. भारत-पाक मॅच झाल्याच्या दुसर्या दिवशी जेवायच्या सुट्टीत वर्गातल्या मागच्या बाकड्यांवरच्या इतर काळ्या सावळ्या पोरां संगं त्याची चर्चा रंगून शेवटी वाद झडायचा. सगळं झालं की ही पोरं म्हणायची 'ए शोएब्या आर इंडियात राहतुस आन् पाकिस्तान कसं रे आवडतय तुला?' ह्यो म्हणायचा 'अरं पाकिस्तान कुठं आवडतय? पाकिस्तानची किरकेट टीम आवडत्ये. त्यो अख्तर बग एकदम रावळपिंडी एक्सप्रेस सारखा बाॅलिंग करतो... श्रीकांतला जमतं का?' ...... माझी शरीरयष्टी चांगल्या खात्यापित्या घरातल्या पोरासारखी त्यामुळं बाॅल माग पळायला आवडायचं न्हाय आन म्हनून किरकेट बी न्हाय आवडायचं... तरी कधी मधी कुनी पन ईचारायचं 'तुला कुटली टीम (किरकेट ची) आवडत्ये? ' इथं केबीसी वानी चार औपशन नसायचे. ईचारनारा दोनच औपशन द्यायचा... ' इंडिया की पाकिस्तान' .... त्यामुळं आपलं उत्तर इंडिया असायचं... त्यावेळी मला कुनी 'तुला कुटली टीम ( फुटबाॅलची) आवडत्ये ?' असं विचारलं असतं आनी 'इंडिया की ब्राझिल' असं औपशन दिलं असतं तर मीच काय कुनीबी 'ब्राझिल...... ललललला....ललललला....ब्राझिल....' असं उत्तर दिलं असतं... असो... तर शोएब्याचं पाकिस्तान किरकेट टीमवरचं प्रेम एव्हना पुढं बसणाार्या गोर्या गोमट्या पोरांसकट सगळ्या वर्गाला म्हाईत झालतं..... माझ्या सारख्या मागच्या बाक वाल्यांना खुप आधीपासून म्हनजे नववी पासून माहीत होतं.... मी एकदा त्याला बोल्लोपन की 'येडा बीडा हाय क्या? तूझे काय को पाकिस्तान की टीम आवडत्या रे?...' त्याने त्याचं ठरलेलं खरखुरं उत्तर दिलं.... मी म्हटलं ' येडे ** के तुझे लोका क्या कयींगें?...उनको जरा बी पटनला नई'... ही झाली नववीतली गोस्ट...दहावी सुरू हुती तवा कारगिल झालं हुतं.... आमच्या शाळंला ग्राउंड नसल्यानं चार पाच पोरी माईकवर प्रार्थना, प्रतिज्ञा आनी राष्ट्रगीत म्हनायच्या. आमी वर्गातली पोरंपोरी नुसता अँक्शन करायचो. वर्गातली वांड मेंबरं हे सगळं सुरू असताना कधी कधी एकमेकाला वाकुल्या दावत खिदळायची... शाळंचं शेवटचं वर्ष संपायला आलतं... प्रार्थना आनी प्रतिञा संपुन राष्ट्रगीत सुरू झालं... वांड मेंबरांचं वाकुल्या दावनं चालु व्हत्ं...... आपल्या काळ्याकुट्ट चेहर्याच्या बॅकग्राउंडवर आपले पांढरे शुभ्र दात चमकवत शोएब्या कुनाला तरी स्माईल देत हुता... पॅसेज मध्ये वर्गाच्या खिडकी समोर राष्ट्रगीता करीता स्तब्ध उभारलेल्या मास्तराने शोएब्याला हसताना बगितलं... राष्ट्रगीत संपलं आनी .. भारत माता की.... जय... वंदे .... मातरम्...या घोषनांना शोएब्या सकट सगळ्यांनी साथ दिली ... घोषना संपल्या संपल्या मास्तर तरा तरा वर्गात शिरला.... अन् थेट शोएब्या जवळ जाऊन त्याच्या कानाखाली आवाज काढला... 'लाज नाही वाटत का ? राष्ट्रगीत चालू असताना हसतोस ते...'.... 'साॅरी सर ...!' शोएब्या गाल चोळत बोलला.... 'साॅरी काय साॅरी......' मास्तर पुढं कायतरी बोलनार तवर मधल्या बाकावरचा पुढं पुढं करनारा गव्हाळ रंगाचा पोरगा म्हटला.. ' सर याला इंडियाची टीम पेक्षा पाकिस्तानची टीम जास्त आवडते' ..... त्याचं संपू पर्यंत पुढच्या बाकावरचा एक गोरा गोमटा हुशार पोरगा बोलला ..'सर हा कीनई इंडिया पाकिस्तान मॅचच्या वेळी पाकिस्तानला सपोर्ट करतो'..... पुढच्या बाकावरचा दुसरा गोरा गोमटा शोएब्याकडं जळजळीत कटाक्ष टाकुन बोला की ' होय सर... याला पाकिस्तान आवडतो आणि हा पाकिस्तानला सपोर्ट पण करतो..' हे आयकून मास्तरच्या तळपायाची आग मस्तकात गेली...त्याने शोएब्याला एका माग एक थोबाडीत मारायला सुरू केली... 'हरामखोर पाकिस्तान आवडतं का तुला? निर्ल्लज ..' मास्तर कडनं बसनार्या कानसुले झेलत झेलत शोएब्या आपली बाजू मांडत हुता...' सर.. नाय ओ.. पाकिस्तान नाय आवडत... नुसती टीम आवडत्या...' ......'अरे हरामखोरा नुसती टीम आवडते का तुला?' असे म्हनून मास्तरने शोएब्याच्या शर्टाला धरून त्याला बेंच मधनं भाईर वडून भिंतीकडं ढकलं... त्यात त्याचा शर्ट टारकन फाटला... भिंतीला घालून मास्तर त्याला बकाबक बुकलून काढत व्हता.... मास्तरची प्राणप्रिय शिस्त मोडून सगळा वर्ग भवतालच्या बेंचवर दाटीवाटीनं उभं राहून मास्तरची मर्दुमकी बघत होता.....हुशार पोरं 'याला अशीच शिक्षा मिळायला हवी...' 'याला असाच धडा शिकवला पाहिजे..' असं म्हनत व्हती... त्यनं मास्तर अजून चेकाळत हुता.... शेवटी विशीतल्या शोएब्याच्या ग्रहण शक्ती समोर चाळीशीतल्या मास्तरची मारक शक्ती कमी पडली... 'परत असं केलंस तर याद राख गाठ माझ्याशी आहे.' असं म्हनून वर्गशिक्षक असलेला मास्तर पुढे खुर्चीवर जाऊन बसला अन् हजेरी घेऊ लागला.... आपलं नाव आलं की पोर उभं राहून 'हजर' म्हनाय लागली.....तिकडं शर्टाच्या काॅलर पासून मना पर्यंत आपलं जे जे फाटलयं ते ते गोळा करून शोएब्या भरल्या डोळ्यानं आपल्या बाकावर बसला... मास्तर ने नाव पुकारले.. 'शोएब बारगीर'.... आपलं सगळं फाटलेलं गोळा करून सावरत शोएब्या उभं राहून द्रूढपने 'हजर' म्हनाला..... कोनती ही प्रतिक्रया न देता मास्तर हजेरी संपवून तास घेऊन निघून गेला... दुसरा मास्तर तास घ्यायला आला... त्या कोमल ह्रदयाच्या आनी आवाजाच्या मराठीच्या मास्तराने शोएब्याचा अवतार बघून 'बारगीर काय झालं रे?' म्हनून चौकशी केली... पन् शोएब्या ऐवजी हुशार पोरांनी त्याला इत्यंभूत माहीती पुरवली.... मग काही न बोलता मास्तर तास घेऊन निघून गेला.... असे अजून दोन तास संपले... माझ्या सकट मागच्या बाकावरची पोरं अधून मधून त्याच्या कडं बघायची.... मग जेवायची सुट्टी झाली अन् मागच्या बाकावरची पोरं शोएब्या भोवताल जमली तसं एवढा वेळ दम धरलेला धिप्पाड शोएब्या हुंदके देऊन ढसाढसा रडाय लागला... त्याच्या मोठ्या घोगर्या आवाजानं त्याचं रडनं लई भेसूर वाटत हुतं.... सहन न होनारं.... न बघवनारं.... शोएब्याच्या बाकावर त्याच्या शेजारी बसनारं मारवाड्याचं पोर...मधल्या बाकावरच्या पुढं पुढं करनार्या चुगलखोराला बोल्ला '****च्या... येला पाकिस्तानची टीम आवडते ते मास्तरला कशाला बोल्लास? नुसती टीमच आवडते की ... ते त्येला कशाला सांगितलास?'..... मग शोएब्या पानावलेल्या डोळ्यानं मधल्या बाकांपासून पुढच्या बाकापर्यंतच्याना बघून बोलू लागला....'**च्यांनो....हजारदा सांगितलं हुतं की पाकिस्तानची टीम आवडत्या....पाकिस्तान नव्हं रे ***च्यानो.....' पन पुढच्या बाकावरच्या पोरांकडं येळ नव्हता..... त्यांना जेवायचे होते... शर्टाच्या कॉलर पासून मना पर्यंत फाटलेलं समधं घेऊन शोएब्या मधल्या सुट्टीतच घरी गेला.... त्यानं घरी सांगितलं की नाय ?...म्हायीत नाय... सांगितलं असतं तरी त्याचा एमआयडीसीत जानारा बा शाळंत येउन काय भांडनार....पन जखम लई खोलात झालती... काही दिसानंतर दहावी संपली..... अदनं मदनं शोएब्या मार्केटात दिसायचा.... नंतर मी पुन्याला आलो त्यामुळं परत बरीच वर्ष नाय दिसला.... तीन वर्षापूर्वी कोयनेनं गावाकडं जाताना कराड स्टेशनला मार्केटींग वाले कपडे घातलेले तीघं चौघं चढले.... त्यात शोएब्या होता... गळाभेट घेत 'अरे मुफ्या.... कां हाय तू मर्दा... कत्ते दिन शी दिशा............' असा आमचा संवाद सुरू झाला...कोन कोन भेटलं...कोन कुठे...काय करतय अशी सगळी चौकशी करून शाळेतल्या आठवणींना उजाळा मिळाला....पन या घटनेचा विषय नव्हता झाला....... गाव आलं तसं आम्ही एकमेकांचा निरोप घेतला..... मोबाईल नंबरची देवाण घेवाण झालती.... पन ना त्यानं मला फोन केला ना मी त्याला..... बहुदा त्या घटनेचा ओरखडा माझ्या मनात खोलवर कुठेतरी होता.... त्यामुळंच सद्याची परीस्थिती बघून ते समधं परत आठवलं....बिछान्यात दीड दोन वाजेपर्यंत चैन पडत नव्हती ... सगळं सारखं डोळ्यासमोर यायला लागलं..... म्हनून लिवून काढलं.... आता पहाट झालीया ...नवा दिस सुरू होईल....पन एक प्रश्न सारखा मनात यायलाय की शोएब्याला पन आत्ता ही परीस्थिती बघून हे समधं आठवत असेल का?
(फक्त शोएब्याचं नाव बदललेले आहे.... बाकी माझ्या सकट सगळं जसं घडलं तसं लिहलय.... )